किसान मालिकेतील २७ व्या कृषी प्रदर्शनाला मोशी येथे सुरुवात झाली असून कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज (गुरुवार) शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. राज्यातील तसेच परराज्यातील शेतकरी गटा-गटाने प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. प्रदर्शनात देशातील विविध कंपन्यांची तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कृषीआधारित उत्पादनांची दालने उभी करण्यात आली आहेत.

पहिल्या शेतकरी गटाच्या हस्ते हवेत फुगे सोडून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा मान बीड येथील मंगल वैरागी, जुन्नरचे सोपान घोलप यांना मिळाला. हे कृषी प्रदर्शन रविवार (१७ डिसेंबर) पर्यंत सुरू राहणार आहे. कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्र, ट्रॅक्टर, वीजपंप, ठिबक सिंचन संच यांची मांडणी करण्यात आली आहे. पिकांच्या विविध जाती आणि त्यांचे बी-बीयाणे आदींचीही दालने सर्वाधिक संख्येने पहायला मिळत आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या विविध विभागांची दालनेही मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपची माहिती देणारी दालने शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत. रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी परवाना लागत नसलेल्या पिस्तूल यांची दालनेही शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत. पंधरा ते वीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी गुरुवारी कृषी प्रदर्शनाला भेट दिली.

पंधरा एकर जागेमध्ये प्रदर्शन भरले असून पाचशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजकांनी त्यात भाग घेतला आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने प्रदर्शनात सादर करण्यात आली आहेत. यंदाच्या कृषी प्रदर्शनामध्ये संरक्षित शेती, पाणी नियोजन, शेतीशी संबंधित यंत्रसामग्री, शेती व लघु उद्योग अशी दालने तयार करण्यात आल्याची माहिती संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.