18 January 2019

News Flash

आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्य़ांत दोन हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच..

सर्वाधिक मोठी मालमत्ता डीएसके समूहाची

डी. एस. कुलकर्णी

सर्वाधिक मोठी मालमत्ता डीएसके समूहाची

ठेवीदारांना आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ७९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची सर्वाधिक मोठी मालमत्ता आहे. डीएसके समूहाच्या अठराशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गेल्या वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ांचा आढावा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी घेतला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त शुक्ला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडून गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्य़ांची माहिती दिली. तसेच गंभीर स्वरूपाचे दाखल गुन्हे आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगांवकर, साहेबराव पाटील यावेळी उपस्थित होते.

शुक्ला म्हणाल्या की, ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून ७९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ठेवीदारांना विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या १०६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची अठराशे कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भूखंडात गुंतवणुकीच्या आमिषाने टेम्पल रोझ कंपनीने राज्य तसेच परराज्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या कंपनीच्या ३०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. फडणीस प्रॉपर्टीजची तीस कोटी रुपयांची मालमत्ता तसेच हडपसर येथील धनदा कॉपरेरेशनच्या दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया पार पडली आहे.

सायबर गुन्हे वाढले

पुणे शहरात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी ३२५ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्य़ांमध्ये ९७ आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सायबर गुन्ह्य़ांच्या तक्रारींचे पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी सांगितले.

सायबर पोलीस ठाणे अधांतरीच

पुण्यात सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. सायबर गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण विचारात घेऊन सायबर पोलीस ठाण्याला केव्हा मंजुरी मिळेल, हे मला माहिती नाही. प्रस्ताव विचाराधीन असून सध्या पोलिसांकडून जनजागृती मोहिमेवर भर देण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव सरकारकडे

पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा निर्णय सरकारच्या हातात आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय नेमके कधी सुरू होईल, याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी स्पष्ट केले.

First Published on January 13, 2018 4:37 am

Web Title: biggest financial scams in pune