‘बाईकर्णी’च्या चमूचे सिक्कीमच्या नागरिकांकडून कौतुक; दीड हजार किमीची मोहिम फत्ते

‘दुचाकींचे शहर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात मोठय़ा संख्येने युवती आणि महिला रोज दुचाकी वापरतात. असे असले तरी लांब पल्ल्याच्या मोहिमा दुचाकींवरून करण्याचे साहस ही पुरुषांची मक्तेदारी, असा समज पुसण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून ‘बाईकर्णी’ या महिलांच्या समूहातर्फे केले जात आहे. पुणेकर असलेल्या प्रियांका डांगी, मृणाली झोडगे, ज्योती सिंह, भावना मकवाना आणि सुषमा नाटेकर यांनीही नुकतीच दुचाकींवरून सिक्कीमची दीड हजार किलोमीटरची मोहीम पूर्ण करत लक्षणीय कामगिरी नोंदवली आणि तुम्ही खूप धाडसी मुली आहात, अशी कौतुकाची थाप त्यांना सिक्कीममधील स्थानिकांनी दिली.

सत्तावीस ते सेहेचाळीस वर्षे वयोगटातील या महिलांनी दुचाकीवरून प्रवास करण्याचा त्यांचा छंद जपण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले होते. यापूर्वी हंपी-दांडेलीची मोहीम पूर्ण केल्यानंतर लांब पल्ल्याची मोहीम करण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला. त्यामुळे सिक्कीमच्या मोहिमेवर जाण्याचे त्यांनी निश्चित केले. पुण्याहून बागडोगरापर्यंतचा प्रवास त्यांनी विमानाने केला. दुचाकी पुण्याहून बागडोगरा येथे पाठवण्यात आल्या. बागडोगराहून सिक्कीममधील गंगटोक, लाचेन, लाचुंग, युमथांग, गुरूडोंगमार लेक, नथुला पास, बाबा मंदिर, चंगू लेक हा टप्पा पूर्ण करून बागडोगरा येथे परत असा तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास या बाईकर्णीनी पूर्ण केला.

प्रियांका डांगी म्हणाली, सिक्कीम राज्याबाबत असलेले कुतूहल, निसर्गाची ओढ आणि दुचाकी चालवण्याची आवड यांमुळे आम्ही या मोहिमेचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात तेथील रस्ते हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. वळणावळणांचे घाट रस्ते, निसर्गसौंदर्य यांसाठीच्या उत्साहावर रस्त्यांच्या अवस्थेने काही प्रमाणात पाणी फिरवले. प्रवास संस्मरणीय झाला. मात्र लहानसा अपघात झाला तरी बुलेटसारखी जड दुचाकी उचलून ती पुन्हा उभी करणे हे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. पुढील टप्प्यात लेह-लडाख येथे दुचाकीवरून जाण्याची इच्छा आहे.

अवजड दुचाकी घेऊन ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तरूण मुले आणि पुरूष अनेकदा येतात. मात्र महिला फार कमी येतात. खराब रस्ते, संमिश्र हवामान या अडचणींवर मात करत तुम्ही एवढय़ा उंच प्रदेशात आलात याचे कौतुक वाटते. तुम्ही खूप धाडसी मुली आहात, अशी शाबासकीची थाप स्थानिकांनी दिली, तेव्हा सगळ्या कष्टांचे सार्थक झाले, अशी भावना मोहिमेत सहभागी महिलांनी व्यक्त केली.

आम्हीच चालक, आम्हीच मेकॅनिक!

लांब पल्ल्याच्या प्रवासात दुचाकी बंद पडणे, क्लच वायर, एक्सलरेटर वायर तुटणे अशा शक्यता असतात. टायर पंक्चर होणे ही समस्या तर जवळच्या प्रवासात देखील येऊ शकते. दुर्गम भागात प्रवास करताना अशा वेळी कोणतीही मदत मिळण्याची शक्यता कमी असल्याने या प्राथमिक गोष्टी आम्ही शिकून घेतल्या. दुरुस्तीसाठी लागणारी साधने प्रवासात जवळ ठेवली. त्यामुळे दुचाकी बंद पडली म्हणून कुठेही मदतीची वाट पाहात थांबावे लागले नाही, असे या उत्साही महिलांनी सांगितले.