सामान्य नागरिकांना डोकेदुखी; उत्पादक आणि विक्रेते नामानिराळे

डुक्कर हॉर्न, अ‍ॅम्ब्युलन्स हॉर्न, प्रेशर हॉर्न, मल्टीसाऊंड हॉर्न असे नानाविध प्रकारचे हॉर्न वाजवित सुसाट वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वारांना शहरात रान मोकळे आहे. रात्री अपरात्री जोरात हॉर्न वाजवित जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा उच्छाद शहरात सर्वत्र दिसत असून पोलिसांना पाहताच काही वेळ हॉर्न न वाजविता पुढे जाणारे दुचाकीस्वार सामान्यांच्या दृष्टीने डोकेदुखी झाले आहेत. काही वेळा कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होते, मात्र हॉर्न उत्पादक आणि विक्रेते नामानिराळे असल्याचे चित्र पाहायला मिळते.

मोटार वाहन कायद्यानुसार कर्कश हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. विशेषत : रुग्णालयांच्या परिसरात कर्कश हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्कश  हॉर्न वाजवित जाणाऱ्या दुचाकीस्वार युवकांचे घोळके शहरात फिरत असतात. विशेषत : रात्री अपरात्री हॉर्न वाजविणारे टोळकी शहराच्या वेगवेगळ्या भागात उच्छाद घालतात. स्थानिक रहिवाशांना अशा टोळक्यांविरुद्ध तक्रारदेखील करता येत नाही. तक्रार केल्यानंतर टोळके जागेवर असेल, याची शाश्वती नसते. सध्या युवकांमध्ये बुलेट वापरण्याचे आकर्षण आहे. बुलेटच्या फायरिंग यंत्रणेत काही बदल करुन त्यातून फटाक्यासारखा आवाज निर्माण केला जातो. त्याला ‘इंदुरी फटाका’ असे म्हणतात. बुलेटचे काम करणारे गॅरेजचालक बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन फटाक्यासारखा आवाज येईल अशी व्यवस्था  करुन देतात.रात्री अपरात्री फटाक्यांसारख्या आवाज निर्माण करणारे बुलेटचालक  सुसाट वेगाने जातात. अशा बेलगाम दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी मध्यरात्री पोलीसदेखील नसतात.

कर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांना एक हजार रुपये दंड

वाहतूक पोलिसांकडून कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येते. खासगी प्रवासी वाहतूक करणारे बसचालक प्रेशर हॉर्नचा वापर करतात.मोटार वाहन कायद्यानुसार कर्कश हॉर्न वाजविणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो. पोलिसांकडून कारवाई करण्यात आली तरी कर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांची खोड मात्र मोडत नाही.