दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत राजेंद्र गायकवाड (वय २९ रा.राजगुरू नगर) आणि विठ्ठल अशोक उंबरे (वय ३२ रा.नाणेकर वाडी चाकण) हे दोघे हिंजवडीमधील फेज ३ येथील कंपनीच्या पार्किंग पार्क केलेल्या दुचाक्यांची टेहाळणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी २७ स्प्लेंडरसह अन्य कंपनीच्या ६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. हे दोघेही सराईत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. दुचाकी विकून मौज मजेसाठी ते पैसे जमवायचे. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

हिंजवडी, पिंपरी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड, चाकण, खेड, खडक, कोंढवा या परिसरातून त्यांनी मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, गुन्हे पोलीस निरीक्षक उंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश धामणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम टोणपे, सचिन उगले, ज्ञानेश्वर मुळे यांनी ही कारवाई केली.