बाइकवर ३६ तासांत २४५० किलोमीटर अंतर पार करण्याचे लक्ष्य.. एकाच दमात प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान.. सोसाटय़ाचा वारा, अचानक आलेला वादळी पाऊस.. बाइकने अॅव्हरेज कमी दिल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी जास्त वेळा थांबवे लागणे.. अशी आव्हाने पार करत पुण्यातील चार तरुणांनी आपले लक्ष्य पूर्ण केले आणि आपण जगातील ‘टफेस्ट रायडर’ असल्याचे सिद्ध केले. एकत गोष्ट मात्र चटका लावून गेली, हे सारे जुळवून आणणारा आणि सर्वात पुढे असलेला या मोहिमेचा नेता रोहन पानघंटी मात्र बाइकमध्ये मध्येच बिघाड झाल्यामुळे हा विक्रम करू शकला नाही!
‘आयर्न बट असोसिएशन’ या अमेरिकेतील प्रसिद्ध बाइक असोसिएशनने स्थापित केलेला आणि मैलाचा दगड समजला जाणारा एक विक्रम म्हणजे- ‘बन बर्नर’. एका दमात सलग २४५० किलोमीटरचा टप्पा पार करायचा, तोसुद्धा ३६ तासांच्या आत. असे केल्यावर या असोसिएशनकडून ‘वर्ल्डस् टफेस्ट रायडर’ हा किताब बहाल केला जातो. तो मिळवणे हे जगभरातील बाइकवेडय़ा रायडर्सचे स्वप्न असेत. हे आव्हान स्वीकारून पुण्यातील सहा तरुण गेल्या शनिवारी दुपारी ३ वाजता पण्यातून निघाले. पुणे-चेन्नई-पुणे असे २४५० किलोमीटरचे त्यांचे लक्ष्य होते. या मोहिमेचा नेता होता- रोहन पानघंटी. इतर सदस्य होते- विनिल खारगे, संग्राम शेलार, स्वप्निल उखंडे, अमित चव्हाण आणि रवी राजभोज.
मोहिमेला सुरुवात झाली, त्याच वेळी पुण्यात आणि संपूर्ण राज्यभर पावसाचे मळभ होते. त्यामुळे शेड-शिवापूर ओलांडताच पावसाला सुरुवात झाली. त्याने अगदी कोल्हापूपर्यंत साथ केली. पण पावसाची साथ म्हणजे बाइक घसरण्याचा धोका. त्यातच विक्रम करण्यासाठी वेग राखण्याचे आव्हान होते. या परिस्थितीत वेग राखत हा खडतर टप्पा पार केला. त्यानंतर येतानासुद्धा बंगळुरूपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हुबळी ते पुणे या सुमारे ४५०-५०० किलोमीटरच्या टप्प्यात तर संपूर्ण पाऊस होता. अर्थातच प्रवासात गाडय़ांचा लहान-मोठा बिघाड, चेन निघणे, बाइकच्या व्हायब्रेशनमुळे आलेली अडचण अशा अनेक गोष्टींवर मात करून या पथकातील संग्राम शेलार, स्वप्निल उखंडे, अमित चव्हाण आणि रवी राजभोज या चौघांनी हे अंतर ३६ तासांत पार केले. रोहनने २२ तासांत जवळजवळ तीन-चतुर्थाश अंतर पार केले. मात्र, त्यांच्या बाइकमध्ये बिघाड झाला. बरेच प्रयत्न करूनही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे त्याला हा विक्रम अध्र्यावरच सोडावा लागला, तर विनिलला आरोग्याचा त्रास झाल्यामुळे तो पूर्ण करता आला नाही. मात्र, इतर चौघांनी तो स्थापित केला. आता त्याच्या नोंदी आयर्न बट असोसिएशनकडे पाठवून हा विक्रम नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे.
खडतर तरीही आनंददायी’
‘‘हा संपूर्ण प्रवास खडतर होता. अचानक आलेल्या पावसाने आमच्यापुढे मोठे आव्हान उभे केले होते. बाइक स्लिप होणे, फॉग लॅम्प पडणे, व्हायब्रेशनमुळेही अनेक अडचणी आल्या. तरीही ही आव्हाने पार करून वेग राखणे आणि हा प्रवास वेळेत पूर्ण केल्याचा आनंद, समाधान आहे. सर्वाचा विक्रम झाला असता तर आनंद आणखी वाढला असता.’’
– स्वप्निल उखंडे