शहरातील सोसायटय़ांना पर्जन्य जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा कार्यान्वित करण्याची सक्ती करणाऱ्या महापालिकेनेही स्वमालकीच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित करून कोटय़वधी लिटर पाण्याची बचत केली आहे. महापालिकेच्या ७४ इमारतींमधून तीन वर्षांत पाच कोटी लिटर पाण्याचा संचय झाला असून अन्य इमारतींवरही ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पर्जन्य जलसंधारणाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने शासकीय इमारतींवर पर्जन्यजलसंधारण यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकरक केले आहे. तसेच सन २००२ च्या इमारतींना परवानगी देताना पर्जन्य जलसंधारणाची यंत्रणा उभारणे सक्तीचे केले आहे. शहरातील सोसायटय़ांकडूनही त्याला प्रतिसाद मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाच कोटी लिटर पाण्याचा संचय करून ही यंत्रणा राबवण्यात पुढाकार घेतला आहे. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा महापालिकेच्या ७४ इमारतींवर बसविण्यात आली आहे.

महापालिकेच्या मालकीच्या साडेतीनशेहून अधिक इमारती आहेत. त्यापैकी ७४ इमारतींमध्ये पर्जन्य जलसंधारण यंत्रणा बसविण्याच्या कामाला टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या ७४ इमारतींमध्ये  कोटय़वधी लिटर पर्जन्य जलसंचय प्रारंभ झाला. सन २०१६ मध्ये प्रथम काही इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तर डिसेंबर २०१८ पर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्व ७४ इमारतींवर पर्जन्य जलसंधारण व्यवस्थापनाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये महापालिकेच्या शाळा, नाटय़गृहे, रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. त्यातून पाच कोटी लिटर पाण्याचा संचय झाला आहे. पर्जन्य जलसंधारणाची यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाल्यानंतर निवृत्त कर्नल दळवी यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेच्या या इमारतींमध्ये शेकडो नागरिक दररोज कामानिमित्त येत असतात. या पाणी संचयामुळे त्याचा किमान पाच लाख नागरिकांना फायदा होत आहे, अशी माहिती निवृत्त कर्नल दळवी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पुढील टप्प्यात उर्वरित इमारतींवर पर्जन्य जलसंधारण यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही दिवसांत ती उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

यंत्रणा कुठे

१० नाटय़गृहे, २८ रुग्णालये, २१ शाळा, ७ क्षेत्रीय कार्यालये, २ व्यावसायिक इमारती आणि ७ क्रीडा संकुलांमध्ये महापालिकेने पर्जन्य जलसंचयासाठीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

तांत्रिक सल्ला आणि सर्वेक्षण

शहरातील अनेक सोसायटय़ांकडून जलसंधारण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. आजमितीस शहरात तब्बल तीन हजार सोसायटय़ांनी अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. मात्र काही वेळा चुकीच्या पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आल्यामुळे त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याचेही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. तांत्रिक सल्ला आणि इमारतींचे सर्वेक्षण त्यासाठी करावे लागणार आहे.

माहितीसाठी संपर्क कुठे करता येईल?

* कर्नल शशिकांत दळवी- ९८६०५७७३६४

*  अविनाश शिंदे- ९४०४७३०८७९

* अनिरूद्ध भारती- ९८२३०५२५७३

* स्वप्नील पोतदार- ९८९०१३०७७५