जैवविविधता हे भारताचे वैशिष्टय़ आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पती वैविध्यपूर्ण असून हे जीव आपले वेगळेपण जपून आहेत. बदलत्या निसर्गचक्रामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे जीव आणि त्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. अशा जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या कामामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.

जगभरात २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे कव्हेन्शन फॉर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन (सीबीडी) गेली २४ वर्षे साजरे केले जात आहे. यंदा त्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्त सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट अँड बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनतर्फे (एस.ई.बी.सी.) पुणे आणि गोवा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिमालय ड्रग कंपनी, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, स. प. महाविद्यालय, बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी), हेरिटेज इंडिया, वनसंशोधन आणि राज्य शासनाचा वन विभाग यांच्यातर्फे मंगळवारी (२२ मे) एम्प्रेस गार्डन येथे सकाळी सव्वादहा वाजता हा दिवस साजरा केला जाणार आहे. जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धनाच्या कामामध्ये युवकांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग असेल, अशी माहिती एस.ई.बी.सी. चे उपाध्यक्ष डॉ. श्रीनाथ कवडे आणि एम्प्रेस गार्डनचे सचिव सुरेश िपगळे यांनी दिली. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी एम्प्रेस गार्डनमध्ये ‘हेरिटेज ट्री वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जैवविविधतेतील वृक्षांचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ‘बायोडायव्हर्सिटी हंट’ उपक्रमाद्वारे जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणामध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या वर्षीपासून निसर्ग संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेवर आधारित दोन दिवसांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये विविध अधिवास, शेवाळ, बुरशीपासून ते फुले येणाऱ्या विविध वनस्पती, कीटक, पक्षी, उभयचर, जलचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची छायाचित्रे आहेत. औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनामध्ये शंभर देशी वनस्पती आणि त्यांचे उपयोग या विषयीची माहिती उपलब्ध होणार आहे. ‘मानवी जीवनातील जैवविविधतेचे महत्त्व’ या विषयावर लघुपट प्रदर्शन आणि चर्चा होणार आहे.

रानमेवा प्रदर्शन

पश्चिम घाटातील जंगलात विविध जातीच्या वनस्पतींची फळे, कंदमुळं मोठय़ा प्रमाणात खाण्यासाठी वापरली जातात. त्यांचे वैविध्य शहरातील लोकांना माहीत व्हावे आणि त्याचा आस्वाद निसर्गप्रेमींना घेता यावा, या उद्देशातून रानमेवा प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये जांभूळ, आळू, करवंद, आम्बगुळी, फणस, जंगली आंबा, कटक, चारोळी, गुलाबजाम, भोकर, शिंदोळ्या, टेम्भुर्णी, रान केळे, अक, अटकी, आवळा, कोकम, आमसूल, तोरण या फळांसह करांदा हे कंदमूळ, मांकडशिंगी हे खोड आणि मोहाची फुले अशा विविध जंगली मेव्याचा आस्वाद चाखण्याचा आनंद निसर्गप्रेमी मंडळींना मिळणार आहे.