दिलीप प्रभावळकर यांचे मत

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट करत असताना त्यावर पुरेसे संशोधन होण्याची गरज आहे. ‘बायोपिक’ हा प्रकार संशोधन करत करण्याचा असल्यामुळेच ती अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रभावळकर यांचा ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित मुलाखतीत प्रभावळकर यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला. डॉ. जब्बार पटेल यांनी प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला.

प्रभावळकर म्हणाले,‘ पोटापाण्यासाठी आपण जे काम करतो ती आपली उपजीविका असते आणि मनापासून, आवड म्हणून आपण जे करतो ती जीविका असते. माझ्याबाबतीत मात्र जीविका हीच उपजीविका ठरली. नाटक आणि चित्रपटात भूमिका करण्याचे कसब स्वतंत्र आहे. नाटकात भूमिका घडवता येते, चित्रपटात मात्र ती आधीच डोक्यात पक्की व्हावी लागते. संगीताचे श्रवण करण्यासाठी विशिष्ट कान असावा लागतो, तशी विनोदासाठीही स्वतंत्र दृष्टी असावी लागते. आक्रस्ताळेपणापेक्षा, मिश्कील ‘टंग इन चीक’ प्रकारचा विनोद मला जास्त आवडतो.’

‘स्वभाव म्हणून मी लाजाळू व्यक्ती आहे, मात्र व्यक्त होण्याच्या आंतरिक इच्छेतून मी लेखन केले. सध्या भाषा बदलली आहे. मराठी भाषेतील जाहिराती, संवाद यांमध्ये हिंदीचा प्रभाव असलेली वाक्ये येतात तेव्हा वाईट वाटते,’ अशी खंतही प्रभावळकर यांनी या वेळी व्यक्त केली.

ते म्हणाले,‘ पु. ल. देशपांडे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर प्रभाव आहे. स्वतकडेही विनोदबुद्धीतून पाहण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. ते कोणाची ‘मिमिक्री’ करतात असे कधी वाटले नाही.

कारण त्यांना त्या भूमिकेचे मर्म सापडलेले असे, त्यामुळे ते नेहमी पु. ल. म्हणूनच समोर आले. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्यामुळे काही व्यक्तिरेखा साकारताना मी केवळ दिग्दर्शकावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करतो. ‘मुन्नाभाई’ चित्रपटातील महात्मा गांधी साकारताना मी हेच केले. चित्रपटात महात्मा गांधी ही व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखेत मी प्रेक्षकांना आवडेन का, अशी शंका होती. मात्र प्रेक्षकांनी या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या याचे समाधान आहे.’