|| तानाजी काळे

माशाच्या शिकारीची छायाचित्रे टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकारांची पावले जलाशयाच्या दिशेने

इंदापूर : उजनी जलाशयावर पक्षी निरीक्षकांना ‘मोरघारां’ची भुरळ पडली आहे. पाण्यातील माशांची शिकार करण्यात पटाईत असलेल्या मोरघार पक्ष्यांनी केलेल्या माशाच्या शिकारीची छायाचित्रं टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार व पक्षी निरीक्षकांची पावले उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत.

उजनी धरणाच्या जलाशयावर गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात अनेक जाती-प्रजातींच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या वास्तव्याची नोंद झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसात पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेणारे रोहित, चित्रबलाक आधी बकु ळ कु ळातील पक्ष्यांच्या मांदियाळीत आता मोरघारीची भर पडली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कवायतींनी पक्षी निरीक्षकांना व हौशी छायाचित्रकारांना भुरळ घातली आहे .

जलाशयावर दरवर्षी ऑक्टोबरपासून अनेक जाती-प्रजातीचे स्थलांतरित पक्ष्यांचे स्नेहसंमेलन भरते. त्यांच्या वास्तव्याने ऑक्टोबर ते मेपर्यंत उजनी जलाशय गजबजून जातो. गेल्या ४० वर्षांत सर्वाधिक पाणीसाठा उजनी धरणाच्या जलाशयात आहे. जानेवारी महिन्यात १०४ टक्केपाणीसाठी असल्याने रोहित पक्ष्यांची सुरक्षित आणि दलदलीची पानथळ थळी निर्माण झाली नाहीत. उजनीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यावर निर्माण झालेल्या दलदलीत खाद्य व त्यांचे अन्न शोधण्यासाठी रोहित पक्षी मोठ्या संख्येने तीरावर येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रोहित पक्षी पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे .

रोहित पक्षी कमी संख्येने उजनी जलाशयावर आले असले तरी उष्ण प्रदेशीय व उपोष्ण प्रदेशीय भागात राहून तेथून सहसा स्थलांतर करीत नाहीत. मात्र, युरोपात कडाक्याची थंडी पडल्यानंतर हे पक्षी आशियाई देशात वळतात. भारताकडे त्यांची पसंती असते. पठारी प्रदेशात पसरलेल्या अथांग उजनी जलाशयावर उबदार थंडी आणि माशांचा येथेच्छ पाहुणचार अशी दुहेरी मेजवानी असल्याने उजनी जलाशयावर स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने रेंगाळतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मे-जूनमध्ये हे पक्षी पुन्हा स्थलांतर करतात .

उजनीच्या तीरावर  सध्या मोरघार  व ब्राऊन हेडेड गल हे पक्षी माशांची शिकार करताना त्यांच्या होत असलेल्या कवायती पक्षिनिरीक्षक आणि हौशी छायाचित्रकारांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता उजनी काठावर मोरघार आणि तपकिरी डोक्याचा कुरव या पक्ष्यांनी पक्षिप्रेमींना भुरळ घातली आहे.