शहरात केवळ बारा तासांत तब्बल १७२ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या प्रजातींमध्ये सहसा न आढळणाऱ्या काही प्रजातींसह किनारी पाणथळ भागात आढळणाऱ्या प्रजातींचाही समावेश आहे.
युहीना इकोमीडिया आणि एचएसबीसी या संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे बर्ड रेस’ या उपक्रमात प्रत्येकी ४ ते ५ पक्षिनिरीक्षकांचा सहभाग असलेल्या २५ गटांनी पक्षिगणना केली. रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशा बारा तासांत कावडी, सिंहगड, दिवेघाट, वीर धरण, पाषाण, बाणेर, उंड्री आणि शहराच्या इतर काही भागांत पक्षिनिरीक्षण करून दिसलेल्या पक्ष्याच्या प्रजातींची नोंद घेण्यात आली.
या पक्षिगणनेत ‘नॉर्दन गोशावक’ आणि ‘पेरीग्रीन फाल्कन’ हे ससाणा पक्षी तसेच ‘अंडरमरीन फ्लायकॅचर’, ‘इम्पिरिअल इगल’, ‘युरेशियन इगल-आऊल’ या पक्ष्यांच्या प्रजाती या वेळी आढळल्याची माहिती उपक्रमाचे समन्वयक सागर पाटील यांनी दिली. ‘वेस्टर्न रीफ इग्रेट’ आणि ‘पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या किनारी पाणथळ भागात सापडणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींचीही या वेळी नोंद करण्यात आल्याचे ते म्हणाले.