22 April 2019

News Flash

 ‘आधार’वरील जन्मतारखेत वर्षांची तफावत असल्यास दुरुस्ती मुंबईला

  आधार कार्डवरील जन्मतारीख, लिंग, पत्ता, छायाचित्र अशा कोणत्याही दुरुस्तीचे काम आधार केंद्रांवर केले जात होते.

(संग्रहित छायाचित्र)

आधार कार्डवरील जन्मतारखेत मूळ जन्मतारखेपेक्षा एक वर्षांपेक्षा अधिक किंवा कमी काळाची नोंद चुकीने झाली असल्यास त्याची दुरुस्ती थेट विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जाऊन करावी लागणार आहे. नव्या वर्षांत हा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

आधार कार्डवरील जन्मतारीख, लिंग, पत्ता, छायाचित्र अशा कोणत्याही दुरुस्तीचे काम आधार केंद्रांवर केले जात होते. स्थानिक केंद्र चालकांकडून कागदपत्रे तपासून त्यामध्ये बदल करण्यात येत होते. मात्र, आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये एक वर्षांहून अधिक काळाची तफावत असल्यास दुरुस्तीसाठी मुंबई येथील यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागणार आहे. या निर्णयाचा फटका सामान्य नागरिकांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जन्मतारखेमध्ये एक वर्षांहून अधिक काळाची तफावत असलेल्या नागरिकांना पुरावे घेऊ न स्वत: यूआयडीएआयच्या मुंबई येथील कफ परेड येथे असलेल्या कार्यालयात जावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना यूआयडीएआयकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी बुधवारी दिली. आधारकार्डवरील जन्मतारखेमध्ये एक वर्षांहून अधिक काळाची तफावत असल्यास ‘यूआयडीएआयच्या मुंबईतील कार्यालयामध्येच दुरुस्ती होणार आहे. एक जानेवारीपासून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्य़ातून जन्मतारखेमध्ये दुरुस्तीच्या तक्रारी येत आहेत. प्रामुख्याने जिल्ह्य़ाच्या परिसरात अधिक तक्रारी आहेत. मात्र, संबंधितांना पुरावे दाखवून स्वत: मुंबईत जाऊ न दुरुस्ती करावी लागणार आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

गैरप्रकारांमुळे निर्णय 

आधारकार्डवर असलेल्या जन्मतारखेमध्ये बदल करून गैरप्रकार करण्यात आल्याचे यूआयडीएआयच्या निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊ न एक जानेवारीपासून मुंबईतील कार्यालयातून जन्मतारखेतील दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काहींनी जन्मतारखेमध्ये बदल करून विविध प्रकारच्या सवलती मिळवल्या आहेत. त्यामुळे स्थानिक आधार केंद्रचालकांचे हे अधिकार कमी केले आहेत. मात्र, तरीही आधार केंद्रचालकाकडून असा प्रकार घडल्यास संबंधितांना काळ्या यादीत टाकून दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे.

First Published on January 24, 2019 1:00 am

Web Title: birth date gap on aadhar mumbai should be repaired