दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांच्या आहारातील बिस्किटांच्या अतिरेकी सेवनामुळे त्यांच्यात बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि कोरडा खोकला यांसारखी लक्षणे आढळत आहेत. वैद्यकीय परिभाषेत लहान मुलांमधील या दुखण्याला मिल्क बिस्कीट सिंड्रोम असे संबोधले जाते.

पुण्यातील मदरहूड रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञांकडून याबाबत माहिती देण्यात आली. दोन वर्षांच्या एका बालकामध्ये पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि कोरडा खोकला ही लक्षणे दिसत होती. वय आणि वजन यांचे गुणोत्तर चांगले होते, मात्र त्या तुलनेत त्याची प्रकृती नाजूक होती. म्हणून त्याच्या आहाराची माहिती घेतली असता एक लिटर दूध आणि बिस्किटे हे त्याचे मुख्य अन्न असल्याचे समोर आले. वयाच्या मानाने आवश्यक असलेल्या इतर पौष्टिक घटकांचा समावेश आहारात नव्हता. त्यामुळे त्याचे हिमोग्लोबिन कमी होते, तसेच प्रकृतीच्याही तक्रारी होत्या.

याबाबत मदरहूड रुग्णालयाचे डॉ. तुषार पारिख म्हणाले, वयाच्या सहाव्या महिन्यापासून मुलांच्या आहारात घन पदार्थाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्या वेळी दूध, बिस्कीट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ दिले जातात. त्यात आइस्क्रीम, चॉकलेट यांचा समावेश असतो. त्यामुळे घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला, पोटदुखी, थकवा हे त्रास सुरू होतात. दूध, बिस्किटे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थामुळे मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दीर्घकालीन तक्रारी उद्भवू शकतात, असेही डॉ. पारिख यांनी सांगितले.

बाजारपेठ..

उदारीकरणाच्या दशकानंतर भारतात दूध-बिस्किटांचा बाजार फोफावला. आकर्षक जाहिराततंत्रामुळे मुलांमध्ये बिस्कीटहट्ट वाढू लागला. गेल्या दशकभरात लहान मुले बिस्किटे आहाराप्रमाणे सेवन करू लागली. या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारणत: १ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

बिस्किटे आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थातील मैदा मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतो. बद्धकोष्ठतेची तक्रार घेऊन येणाऱ्या ५० टक्के  बालकांमध्ये मिल्क बिस्कीट सिंड्रोम आढळतो. या वयात मुलांच्या आहारात तृणधान्ये आणि डाळींचे मिश्रण, भाज्या, फळे यांचा समावेश करायला हवा.

– डॉ. तुषार पारिख