नियमभंग, शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई करणारे पोलीसच नियमांचे पालन करीत नसतील तर त्यांनी ते करावे यासाठी वरिष्ठांना काहीतरी पाऊल उचलावे लागते. पुण्यातील बिट मार्शल्सच्या बाबतीत याची प्रचिती येत आहे. त्यांना हेल्मेट न घातल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त सतीष माथूर यांनी शहरामध्ये हेल्मेट सक्ती केलेली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर हेल्मेट नसल्याची कारवाई करण्यात येत असतानाच दुसरीकडे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी त्वरित पोचणारे बिट मार्शलच या नियमाचा भंग करताना दिसत आहेत. पुणे भागात सुमारे ६० बिट मार्शल आहेत. बिट मार्शल शस्त्रधारी असतो आणि त्याने सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे अपेक्षित असते. मात्र, हे आदेश पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर बिट मार्शल हेल्मेट घालतात की नाही याची पाहणी करण्यात आली. पुण्यामध्ये गेले तीन आठवडे बिट मार्शल नियमांचे पालन करतात का याची पाहणी चालू आहे. हेल्मेट सक्ती असल्यामुळे जे बिट मार्शल हेल्मेट घालत नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी दिली. त्याचाच एक भाग म्हणून नियम न पाळणाऱ्या चार बिट मार्शल्सची बढती तीन वर्षांसाठी थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, काहींना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुत्याळ यांनी सांगितले.