24 January 2021

News Flash

बिटकॉइनच्या आमिषाने व्यावसायिकांना ४२ लाखांचा गंडा

या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बिटकॉइन फसवणुकीचा शहरातील पहिलाच गुन्हा; माहिती-तंत्रज्ञान कंपनीचा संचालक अटकेत

बिटकॉइनच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बिटकॉइनच्या आमिषाने बेचाळीस लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांकडून सिंहगड रस्ता भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. बिटकॉइन फसवणुकीचा हा शहरातील पहिलाच गुन्हा ठरला आहे. या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या फसवणुकीच्या प्रकरणात आकाश कांतिलाल संचेती (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. निशा चैतन्य रायसोनी (वय ४७) यांनी या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संचेती याची सिंहगड रस्ता भागात माहिती-तंत्रज्ञान कंपनी आहे. त्याने वर्षभरापूर्वी रायसोनी यांना बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. बिटकॉइन खरेदी केल्यानंतर बारा महिन्यांत रक्कम दुप्पट होईल आणि दर महिना दहा टक्के वाढ बिटकॉइनमध्ये होईल असे त्याने सांगितले होते. संचेतीने दाखवलेल्या आमिषाला रायसोनी बळी पडल्या. त्यांनी त्याच्याकडे तेरा लाख रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, बिटकॉइन गुंतवणूक तसेच व्यवहारांवर काही र्निबध टाकण्यात आल्यामुळे संचेतीने रायसोनींनी दिलेली रक्कम ‘एमकॅप’मध्ये गुंतवली होती. त्या वेळी ‘एमकॅप’मध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिडॉलर सात ते आठ डॉलर अतिरिक्त मिळत होते.

बारा महिन्यांची मुदत संपल्यानंतर रायसोनींनी पैसे परत करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यावेळी ‘एमकॅप’चे मूल्य  .५ एवढे होते. तेरा लाख रुपये गुंतवल्यानंतर त्यांना परताव्यापोटी अडीच लाख रुपये आले, असे रायसोनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रायसोनी यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

आणखी तीन व्यावसायिकांची फसवणूक

संचेतीने अनिल रमेश गालीम (वय ४७), रमेश रामचंद्र (वय ४२), निनाद खाडे (वय ३५) यांची बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. रायसोनी, गालीम, रामचंद्र, खाडे यांची एकूण मिळून बेचाळीस लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक, अपहार, ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यांतर्गत संचेतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष कार्यक्रमाद्वारे गुंतवणुकीचे आमिष

उच्चशिक्षित असलेल्या आकाश संचेतीने २०१६ मध्ये एका सहकारी महिलेसोबत शहरात बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बिटकॉइन गुंतवणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक व्यावसायिक, नोकरदार सहभागी झाले होते. प्राथमिक तपासात त्याने चौघांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. संचेतीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काय आहे बिटकॉइन?

बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. जगभरात सध्या बिटकॉइन या आभासी चलनाचा बोलबाला आहे. बिटकॉइनमधील व्यवहार हे जोखमीचे आहेत. बिटकॉइनला सरकारकडून अधिकृत मान्यता देण्यात आली नाही, त्यामुळे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यात धोकेही तेवढेच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 4:26 am

Web Title: bitcoin fraud issue
Next Stories
1 पेट्रोलचा दर पुन्हा ८० रुपयांपर्यंत!
2 भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप
3 ग्रामीण भागात शौचालये, सौर दिव्यांची उभारणी
Just Now!
X