News Flash

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला

शिवसेना आणि भाजपा या राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांमधलं युती होती तेव्हा सख्य आणि विरोधात असताना वैर हा नेहमीच राज्यात चर्चेचा विषय राहिला आहे. युती तुटल्यापासून तर या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोना काळातही दोन्ही पक्षांमधला कलगीतुरा सुरूच आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज वाढदिवशी शुभेच्छा देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोमणा मारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

…तर सामनात माझ्यावर आठवड्याला एक अग्रलेख नसता!

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाघ ठरवेल मैत्री कुणाशी करायची…

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातल्या विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते.

मुंबईकर धडा शिकवतील!

दरम्यान, बुधवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं. यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “गेल्या २० वर्षांहून जास्त कालावधी मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचं राज्य आहे. दीड वर्षापासून राज्यातही त्यांचंच राज्य आहे. ४० हजार कोटींचं बजेट असतं. ५८ हजार कोटींच्या एफडी आहेत. पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. किती जण या पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडतात. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत लोकं धडा शिकवतील”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:10 pm

Web Title: bjp chandrakant patil mocks shivsena leader sanjay raut on tiger statement in pune pmw 88
Next Stories
1 सात पाठ्यवृत्तींना ‘यूजीसी’कडून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2 ‘स्वच्छ’सह सामाजिक प्रारूपावरही घाला
3 करोना प्रादुर्भावात पुन्हा वीज देयकांच्या थकबाकीत वाढ
Just Now!
X