भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं असून त्यांच्या कामाचा वेग भयंकर असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. आम्ही त्यांच्यावर टीका करतो ते काय त्यांच्याबद्दल अनादर म्हणून नाही असंही यावेळी ते म्हणाले आहेत. रविवारी पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

“शरद पवार या सरकारला मार्गदर्शन करत असल्याचं दिसत नाही. कारण त्यांच्या कामाचा वेग भरपूर असून संपूर्ण देशाने हे पाहिलं आहे. आम्ही त्यांच्यावर टीका करतो ते काय त्यांच्याबद्दल अनादर म्हणून नाही, तर त्यांचा आदर ठेवूनच टीका करतो. या वयातही ते कोकणात गेले. अजित पवार किंवा जयंत पाटील गेले का? मात्र शरद पवार हे थेट गेले. त्यांना मानलंच पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ एक ते दीड तास गेल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यातील करोनाची दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीवरून तसेच, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही निर्णय होत नाही, असं त्यांनी म्हटलं.

परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. कारण सरकार गोंधळलेलं आहे. कोणी निर्णय करायचे? कसे निर्णय करायचे? या सर्वांच्या बाबतीत गोंधळ आहे. त्यामुळे कशाचाच निर्णय होत नाही. अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय होत नाही, शाळा उद्यापासून सुरू व्हायच्या की नाही? याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.