पुण्यनगरीचे भूषण असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारपासून (१८ जून) होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश बैठकीची नाटकांवर संक्रांत कोसळली आहे. अडचणीत असलेल्या नाटय़व्यवसायाच्यादृष्टीने सुगीचे दिवस असलेल्या शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवसांच्या नाटकाच्या तारखा या बैठकीसाठी काढून घेण्यात आल्या आहेत. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीने दणका दिल्यानंतर या आठवडय़ात भाजपने नाटकांचे कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया नाटय़वर्तुळात उमटली आहे.

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारपासून होत असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आता नाटय़प्रयोगांनाच वेठीस धरण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवसांच्या प्रत्येकी दोन प्रयोगांच्या तारखा बैठकीसाठी काढून घेण्यात आल्या आहेत. त्याचा फटका ‘डोन्ट वरी बी हॅपी’ आणि ‘पती सगळे उचापती’ या नाटकांना बसला आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या सुरक्षेचे कारण पुढे करून नाटय़गृहाच्या कलादालनातील गड-किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनावरही टाच आणली गेली होती. मात्र, आता भाजप सरकारने केलेल्या विकास कामांच्या प्रदर्शनाबरोबरच या प्रदर्शनालाही थोडीशी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील युवक नेता कन्हैयाकुमार याच्या सभेसाठी सुरेल सभा संस्थेतर्फे आयोजित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाची मैफील रद्द करण्यात आली होती. तर, गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त एका नाटकाची तारीख काढून घेण्यात आली होती. प्रत्यक्षात कार्यक्रम किंवा नाटक यापैकी काहीच न झाल्यामुळे रंगमंदिर सुने राहिले होते. आता तारखा काढून घेण्याच्या या रांगेमध्ये भाजपदेखील सहभागी झाला आहे.

रंगमंदिरामध्ये तारखा काढून घेण्याचे प्रकार वांरवार घडत असल्यामुळे सुसूत्रता येण्याच्या उद्देशातून महापालिकेतर्फे तारखांचे चौमाही वाटप केले जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे कार्यक्रम, तसेच केंद्र आणि राज्य सरकारचा कार्यक्रम असेल तरच नाटकाच्या तारखा निर्मात्यांना ‘विनंती’ करून काढून घेतल्या जायच्या, असा पूर्वीचा रिवाज होता. सद्यपरिस्थितीमध्ये राजकीय दबावातून नाटकाच्या तारखा परस्पर काढून घेतल्या जात आहेत. तारखा काढून घेण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने नाटय़निर्मात्यांनाही या प्रकाराबाबत वाच्यता करता येत नाही आणि कोणाकडे दादही मागता येत नाही.