महापालिका निवडणुकांची व्यूहरचना ठरणार

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बठक शनिवारपासून येथे होत असून, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक तयारीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकांची रणनीती या बैठकीत निश्चित होईल.

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठकीच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरीसह राज्यातील १६ महापालिकांच्या निवडणुका फेब्रवारी २०१७ मध्ये होत असून, राज्यातील २८ जिल्हा परिषदा तसेच १४७ नगरपरिषदांच्याही निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा विचार प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत होणार असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर  संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्यामुळे त्याचा फायदा पक्षाला कसा मिळेल यासंबंधीची व्यूहरचना बैठकीत निश्चित केली जाईल. बैठकीत राजकीय ठरावही केले जाणार असून, विविध सत्रांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच शासनाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे आदी विषय चर्चेत येणार आहेत. प्रदेश कार्यकारिणी व प्रदेश कार्यसमितीचे सदस्य, सर्व आघाडय़ांचे अध्यक्ष व सरचिटणीस तसेच सर्व जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस, सर्व आमदार, खासदार असे मिळून सुमारे अकराशे जण या बैठकीसाठी उपस्थित राहणे अपेक्षित आहेत. प्रदेश पदाधिकाऱ्यांची बठक शनिवारी सकाळी होणार आहे.

खडसेंचीही उपस्थिती

प्रदेश बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री आणि पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. राजीनामा द्यावा लागल्यामुळे चर्चेत असलेले एकनाथ खडसे हेही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, खडसे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार का, याबाबत पक्षाकडून ठोस माहिती देण्यात आली नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, प्रकाश जावडेकर, सुधीर मुनगंटीवार, पक्षाचे सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, पक्षाचे उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांच्यासह पालकंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आदींची प्रमुख उपस्थिती असेल.