राज्यात भाजप आणि विरोधी पक्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोदींचे गुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र होईल का? यावर मोदीचं या प्रश्नाच योग्य उत्तर देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. निवडणुका कधीही झाल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांसोबत असल्याचे कारण देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील राजकीय अस्थिरता वाढू नये. तसेच सत्ता पुन्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या हातामध्ये जाऊ नये, यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आज शरद पवार यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर राऊत म्हणाले, शरद पवार हे काहींसाठी होकायंत्र तर काही जणांसाठी धोकायंत्र आहेत. त्यांना सर्व गोष्टी लवकर कळतात. मुंबईतील लोकल सेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या राज ठाकरेंचाही त्यांनी समाचार घेतला. राज यांनी हा मुद्दा शिवसेनेकडूनच उचलला आहे, असा आरोप त्यांनी केला. बुलेट ट्रेनला सर्वात अगोदर विरोध करणारे आम्ही होतो. आमचा मुद्दा हायजॅक करणारा अजून जन्माला यायचा आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात वीट नसते तर रूळ असतो. ते उखडण्याच धाडस फक्त शिवसेनाच करू शकते, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ते म्हणाले की, आतापर्यंत १९ वेळा मंत्रिमंडळ विस्ताराचे मुहूर्त ठरवण्यात आले. पण अजून हा विस्तार झालेला नाही. तो होणार किंवा नाही हे मुख्यमत्र्यांनाच माहिती आहे.