मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पुणे महानगरपालिकेतील भाजपाच्या काही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सत्तेत असून देखील कामे होत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले.

पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी झाला. या दीड वर्षांच्या कालावधीत भाजपाविरोधात प्रशासनामध्ये अनेक वेळा वाद झाल्याचे प्रकार घडले आहे. या संपूर्ण कालावधीत शहरात कोणतेही प्रकल्प पूर्णत्वाकडे गेलेले दिसत नाही. तर कोणत्याही कामाबाबत प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपच्या नगरसेवकानी मांडल्या आहेत.

त्यावरून सत्ताधारी भाजपाची प्रशासनावर पकड नसल्याची टीका अनेक वेळा विरोधकांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या मुख्य सभेदरम्यान भाजपाचे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी प्रभागातील समस्यांबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील प्रश्न सुटत नसल्याची तक्रार केली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा प्रशासनावर भाजपची पकड नसल्याचे स्पष्ट झाले. या घडामोडीला काही तास होत नाहीत तोवर आज पुणे दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना प्रभागातील तक्रारींचा पाढा वाचून या समस्येतून मार्ग काढा अशी मागणी केली. नगरसेवकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असे त्यांनी सांगितले.