भाजपतर्फे संघटनात्मक पातळीवर निवडणुकीची तयारी; ‘विद्यार्थी’ अभ्यासात मग्न

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षातर्फे संघटनात्मक पातळीवर सुरू झाली असून या तयारीचा पहिला टप्पा म्हणून पक्षातर्फे रविवारी (१५ जानेवारी) हजारी भाग प्रमुखांची ‘शाळा’ भरवण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश या शाळेचे अघोषित मुख्याध्यापक असतील. या ‘शाळेत’ येणारे विद्यार्थिरुपी हजारी प्रमुख गेले काही दिवस मतदार यादीच्या ‘अभ्यासा’त मग्न आहेत.

भाजपच्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीत हजारी यादीची रचना महत्त्वाची मानली जाते. या याद्यांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले असून प्रत्येक यादीला एक प्रमुख नेमण्यात आला आहे. शहरात सत्तावीसशे हजारी याद्या आहेत. शहरातील एक्केचाळीस प्रभागांमधील या यादीप्रमुखांचे निवडणूक तयारीसाठी एकत्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे पक्षातर्फे ही ‘शाळा’ भरवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेतील एक्केचाळीस वर्ग खोल्या घेण्यात आल्या आहेत.

शाळेसाठी विद्यार्थी आल्यानंतर प्रथम प्रभागनिहाय हजारी यादी प्रमुखांची नावनोंदणी करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाईल. ‘शाळे’ची पहिली घंटा झाल्यानंतर हजारी यादी प्रमुख आपआपल्या प्रभागाच्या वर्गात जातील. राष्ट्रगीताने या अभिनव शाळेची सुरुवात होईल. त्यानंतर प्रतिज्ञा होईल. त्यानंतर बोधकथा सांगण्यात येईल.

‘शाळे’च्या पहिल्या तासिकेला हजारी यादीमध्ये काम कसे करायचे याची सविस्तर माहिती दिली जाईल. दुसऱ्या तासिकेला समाजमाध्यमांबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. तिसऱ्या तासिकेला निवडणूक आचारसंहितेची माहिती देण्यात येणार असून त्यानंतर सूचनेप्रमाणे सर्व हजारी प्रमुख शाळेच्या मदानावरील मुख्य कार्यक्रमासाठी रांगेत उपस्थित होतील. त्या ठिकाणी प्रभागनिहाय व हजारी यादी क्रमांकानुसार बैठक व्यवस्था असेल. पक्षाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं, मिशन २०१७’ या मतदार यादीच्या सॉफ्टवेअरचे उद्घाटन, त्याच्या वापराची माहिती तसेच राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही.

सतीश यांचे भाषण असा मैदानावरील कार्यक्रम असेल. पक्षाचे मंत्री, आमदार तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.