सेनेचे बालेकिल्ले सर करण्यासाठी व्यूहरचना

पिंपरी : पुण्यातील शिरूर व मावळ मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघावर आपला झेंडा फडकवण्याची व्यूहरचना भाजपने स्थानिक पातळीवर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप-शिवसेनेत संघर्षांचे वातावरण असून युती झाली किंवा न झाली तरीही, त्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

शिवसेनेने लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे चाचपणी सुरू केली आहे. आपल्याकडील मतदारसंघ कायम ठेवून नवे मतदारसंघ ताब्यात घेण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. मावळ व शिरूर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत. त्या जागा पुन्हाजिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार दिसून येतो. सध्याचा शिरूर हा मतदारसंघ पूर्वी खेड मतदारसंघ होता. मतदारसंघांच्या पुनररचनेनंतर नवा शिरूर मतदारसंघ झाला. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता चौथ्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती न झाल्यास शिवसेनेसमोर राष्ट्रवादीबरोबरच भाजपचेही कडवे आव्हान राहणार आहे. अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. भाजपने तथा आमदार लांडगे यांनी यासंदर्भात अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही, मात्र भाजपचा या मतदारसंघावर डोळा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

थोडय़ाफार फरकाने तशीच परिस्थिती मावळ लोकसभा मतदारसंघाची आहे. मावळात शिवसेनेने सलग दोनदा राष्ट्रवादीच्या विरोधात विजयश्री मिळवली आहे. मावळ मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर गजानन बाबर प्रथम खासदार झाले. २०१४ मध्ये शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना संधी दिली, तेव्हा तेही निवडून आले. २०१९ साठी बारणे पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या वेळी त्यांना भाजपचे जास्त आव्हान आहे.  सेना-भाजपची युती न झाल्यास भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे मावळचे संभाव्य उमेदवार असतील, असे पक्षवर्तुळातून सांगितले जाते.

शिवसेनेच्या प्रभावामागे भाजपचा आधार

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे. तथापि, भाजपशी असलेल्या युतीचा प्रत्येक वेळी शिवसेनेला फायदा झालेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती न झाल्यास होणाऱ्या मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.