ठाकरे सरकार अस्थिर वाटत नसल्याचं भाजपा खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्यात काम करत आहोत आणि तसंच काम करत राहणार आहोत असंही सांगितलं आहे. यावेळी त्याने कृषी कायदे रद्द होणार नाहीत, पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील असं सांगितलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“मला हे सरकार काही अस्थिर वाटत नाही. त्यांच तेच पडेल, जेव्हा पडेल तेव्हा पडेल. पडलं नाही तरी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्यात काम करत आहोत आणि तसंच काम करत राहणार आहोत,” असं गिरीश बापट यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन -‘स्वाभिमानी’च्या सांगली – कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात

“केंद्र सरकारने कृषी कायदा केला आहे. तो रद्द होणार नाही. पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. हे कायदे शेतकर्‍यांच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहेत. गेला दीड महिना शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. हे सरकार अस्थिर करण्यासाठी काम केलं जात आहे. या माध्यमातुन देशात अशांतता निर्माण करण्याचं काम आपल्या राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्ष काही करीत आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं पाहिजे,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

“आज मुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी होत आहेत. त्यांनीदेखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. तेच त्यांच्या मूळ विचारला विरोध करत आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि देशातील विरोधी पक्ष विरोध करत आहे असे करू नये. यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल,” अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.