चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या स्मारकास होत असलेल्या विलंबावरून शहरात ‘राजकारण’ सुरू झाले असून, त्यामागे आगामी महापालिका निवडणुकीची पाश्र्वभूमी आहे. महापालिका पातळीवर सर्व बाबींची पूर्तता झाली असताना सरकारी पातळीवर जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येत असून, भाजपकडून स्मारकाच्या कामात खोडा घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक अ‍ॅड. संदीप चिंचवडे यांनी केला आहे.
चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केले. स्मारकाच्या कामास विलंब होण्यामागे भाजपचे राजकारण असल्याचा आरोप या भागातील नगरसेवक चिंचवडे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. चापेकरांच्या शिल्पसमूहास परवानगी देताना भाजप सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. आघाडी सरकारच्या काळात सर्व परवानगी सहज मिळत होती. मात्र, भाजप सरकारकडून फक्त आश्वासने मिळत आहेत.
या स्मारकाला जाणीवपूर्वक खोडा घातला जात आहे. सामान्य प्रशासन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातच स्मारकाच्या फाइलींची देवाणघेवाण सुरू आहे. प्रत्यक्ष कामाच्या नावाने ‘शिमगा’ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून सर्व परवानगी घेतली होती. त्यानुसार स्मारकाचे कामही करण्यात आले. फक्त स्मारकाच्या चौथऱ्यावर पुतळे आणून बसवणे राहिले आहे. मात्र, ते केवळ फाइलींबाबतच्या समस्या दाखवत आहेत. त्यामुळे वर्षभरापासून काम प्रलंबित आहे. हे काम तातडीने मार्गी लावावे, अन्यथा राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चिंचवडे यांनी दिला आहे.