भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर जाणार नाही. दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पुण्यात दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, आम्ही मेगा भरती नव्हे, तर मेरिटवर भरती करू, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राष्ट्रपती राजवट, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आणि सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, अशी राजकीय शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर जाणार का, असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, की भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे भाजपबरोबर जाणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेबरोबर कसे जाणार, असे विचारले असता, शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, असे उत्तर त्यांनी दिले. राज्यातील जनतेच्या मनातील पाच वर्षे टिकणारे मजबूत सरकार देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ नेत्यांशी चर्चा-मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाने आघाडी करून लढविली होती. या बैठकीत राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. पर्यायी सरकार देण्याच्या दृष्टीने या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रदेश पातळीवरील नेतेही चर्चा करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

शरद पवार-सोनिया गांधींची आज भेट

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (१८ नोव्हेंबर) भेट होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. या भेटीनंतर मंगळवारी प्रदेशच्या नेत्यांची त्यासंदर्भात चर्चा होईल. पर्यायी सरकार देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊन भूमिका ठरविली जाईल. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.