News Flash

‘फलकबाजी’ची रणनीती

केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भारतीय जनता पक्षाने पिंपरीत सध्या ‘पोस्टरबाजी’चा धडाका लावला आहे, त्यातून सत्ताधारी राष्ट्रवादीला घायाळ करण्याची भाजपची रणनीती दिसून येते.

खबरबात – भाजप, रिपाइं, पिंपरी

केंद्रात आणि राज्यात आलेली सत्ता, ‘मोदी कार्ड’ची अजूनही असलेली चलती, मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक लक्ष, पक्षाची वाढलेली ताकद, मुख्य व बलाढय़ प्रतिस्पर्धी पक्षाला पडलेले खिंडार आणि युतीसाठी मित्र पक्षाशी सुरू असलेली सकारात्मक बोलणी अशा अनुकूल गोष्टी असल्याने भारतीय जनता पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील लोंढे येऊ लागल्याने भाजपमध्ये ‘हवशे’, ‘नवशे’, ‘गवशे’ यांची गर्दी वाढली. ही सूज आहे की वाढलेली ताकद आहे, हे समजण्यास तूर्ततरी मार्ग नाही. ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पोस्टरबाजी’चा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीच्या विकासयुक्त भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेमागे राष्ट्रवादीला घायाळ करण्याची रणनीती आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा हक्काचा व पारंपरिक मतदार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये वेळोवेळी त्याचा प्रत्यय आला आहे. शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता समोर असतानाही डॉ. प्रतिभा लोखंडे, पृथ्वीराज जाचक, विराज काकडे या भाजप उमेदवारांना भरभरून मते मिळाली आहेत.

पालिकेच्या राजकारणात मात्र भाजपचे अस्तित्व नाममात्र आहे. सरत्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे अवघे तीन नगरसेवक महापालिकेत होते. त्यांची कामगिरी सुमार अशीच राहिली. आता तीनवरून थेट पालिकेची सत्ताजिंकण्याची भाजपची महत्त्वकांक्षा आहे. ‘मोदी लाटे’मुळे देशात भाजपची सत्ता आली, त्याच वातावरणाचा फायदा झाल्याने स्वप्नवत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपच्या पदरात पडले.

केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या पिंपरी पालिकेवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासारखे राष्ट्रवादीचे तगडे मोहरे भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्यापाठोपाठ त्यांच्या समर्थकांचे भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना पूर्ण ताकद देण्याचे धोरण ठेवले आहे.

कितीही नाही म्हटले तरी, या सर्व गोष्टींची अजित पवारांनी निश्चितपणे धास्ती घेतली आहे. दुसरीकडे, भाजपच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होऊ पाहात आहेत. भाजपची ‘राष्ट्रवादी’ होऊ लागल्याने अस्वस्थ होणारा आणि नव्यांच्या आक्रमणामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना असलेला जुन्या कार्यकर्त्यांचा वर्ग पक्षात आहे.

स्थानिक नेत्यांमध्ये असलेले पूर्वापार ‘सख्य’ पाहता, कालचा खेळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. पक्षातील अनेक नेते सध्या हवेत आहेत. सत्ता आलीच, अशा थाटात त्यांचा वावर सुरू आहे.

महापौर कोण होणार, स्टँडिंग कोणाला मिळणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. शिवसेनेशी युती करण्यावरून पक्षात दोन मतप्रवाह आहेत. युती झाल्यास आणि न झाल्यास दोन्हीही परिस्थितीत वेगवेगळे चित्र शहरात राहणार आहे. राष्ट्रवादीला कमजोर समजणे अंगाशी येऊ शकते. तूर्त, काहीही असले तरी गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपची ‘उंच-उंच भरारी’ राहणार, हे मात्र नक्की आहे.

महापालिकेत भाजप

२००७ – ९ नगरसेवक

२०१२ – ३ नगरसेवक

रिपाइं (आठवले गट)

२००७ – १ नगरसेवक

२०१२ – १ नगरसेवक

रिपाइं रणनीती

भाजपची शिवसेनेशी युती होईल की नाही, हे गुलदस्त्यात असले तरी रिपाइंशी मात्र कोणत्याही परिस्थिती युती होणार आहे. रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे या एकमेव उमेदवार महापालिकेत सातत्याने निवडून आल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पिंपरीत भाजप-रिपाइंच्या उमेदवार म्हणून कडवी झुंज दिली. थोडक्यात पराभूत झाल्या असल्या तरी ४७ हजार मतांचा पल्ला त्यांनी गाठला. आता त्या पुन्हा पालिका निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. कमळ चिन्ह घ्यायचे की रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचा निर्णय व्हायचा आहे. जागा वाटपात रिपाइंच्या वाटय़ाला कोणत्या जागा असतील, हे अद्याप स्पष्ट नाही. रिपाइंची आताची रणनीती पुढील विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून राहील, हे उघड गुपित आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:52 am

Web Title: bjp hoarding strategy for pcmc poll
Next Stories
1 द्रुतगती मार्गावरील अपघातात सव्वा कोटींची भरपाई
2 सीमेवर लढणाऱ्या जवानांचे श्रेय राज्यकर्त्यांनी घेऊ नये
3 अजितदादांना हद्दपार करण्यासाठी पिंपरीत सेना-भाजपमध्ये युतीची तयारी
Just Now!
X