ज्योतिष संमेलनातील भाकीत

पाच राज्यांतील निवडणुका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जड जाणार असल्या तरी आगामी लोकसभेनंतर पुन्हा एकदा भाजपलाच संधी मिळेल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी रविवारी ज्योतिष संमेलनात केले. लोकसभेबरोबरच राज्यातील विधानसभा निवडणुका घेतल्या तर भाजप-शिवसेना युतीला लाभ मिळेल, मात्र, दोन्ही निवडणुका स्वतंत्र झाल्यास सत्ताधारी पक्षाला जड जातील, असा दावाही त्यांनी केला.

गुरुकुल विश्वपीठतर्फे आयोजित  अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी मारटकर बोलत होते. संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ . अजयचंद्र भागवत, राजकीय ज्योतिष अभ्यासक विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे , मधुसूदन घाणेकर , पल्लवी भागवत या वेळी उपस्थित होत्या.

मारटकर म्हणाले,की पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात सत्तेमध्ये बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत  देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती हीच सत्तेवर येईल. लोकसभा निवडणुकात सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजपाला सत्ता स्थापनेची पुन्हा संधी मिळणार असून त्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल.

मोडक म्हणाल्या,की ज्योतिष हे क्रियाशील आध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद आध्यात्मातून मिळते.