पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सत्तेत आल्याने भाजपच्या नेत्यांना आपण अजून सत्ताधारी आहोत, याची पुरेशी जाणीव झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रदीर्घ काळानंतर सत्तेत आलेल्या भाजप नेत्यांना अजूनही आपण सत्ताधारी आहोत असे वाटत नाही. याउलट आमच्याकडील लोकांना अजूनही आपण सत्ताधारी असल्याचे वाटते. त्यामुळे सध्या राज्यात गोंधळ सुरू असल्याची मिश्कील टिप्पणी करत अजित पवारांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. याशिवाय, त्यांनी भाजपच्या नेत्यांकडूनच मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यावर होत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील या भाजपच्याच नेत्यांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गृहखात्याच्या कारभाराविषयी चिंता करण्यासारखी परिस्थिती असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.