जगाचे लक्ष लागलेल्या करोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत. यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार? असे कौतुकाचे उद्गार काढणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘त्या स्वप्नात आहेत का?’ असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा दावा हास्यास्पद असल्याचं म्हणत रविवारी त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

“त्यांचा दावा हास्यास्पद आहे. कधीकधी आपण कुठे राहतो याचाच प्रश्न पडतो. पुण्यात ही लस विकसित झाली ते कोण नाकारत आहे. परंतु त्याला आर्थिक साहाय्य कोण करत आहे, त्यावर कोण लक्ष ठेवत आहे, लसीचा आढावा घ्यायला कोण आलं हे पाहायला हवं. जर बारामतीत असतं तर बारामतीला श्रेय दिलं असतं,” असं म्हणत पाटील यांनी टोला लगावला. आम्ही पण पुणेकर आहोत आम्हालाही ते मान्य आहे. म्हणून भारतानं लस विकसित केली, पंतप्रधानांनी यात लक्ष दिलं. आता लस देण्याचं नियोजन किती मोठं आहे. हे आता सुप्रिया सुळे करणार का? की हे आता बारामतीमध्ये तेथील लॅबमध्ये चालणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन दावा केला तर गैरसमज करु नये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला होता. या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी दावा केल्यास तुम्हाला सांगता येईल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.