News Flash

३५० कोटी रुपये पोत्यात भरुन अजितदादांच्या टेबलवर टेकवा आणि म्हणा… : चंद्रकांत पाटील

"मी १०० कोटींचे अगाऊ पेमेंट करेन", असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत

(फोटो सौजन्य: पीटीआय आणि ट्विटरवरुन साभार)

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य सेवा कोलमडल्याचं चित्र दिसत आहे. ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिविर इंजेक्शन सारख्या करोना काळातील अत्यावश्यक आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या सेवांच्या नियंत्रणाचे आणि पुरवठ्यासंदर्भातील हक्क मर्यादीत असल्याने त्या पुरवण्याची तयारी असली तरी नियमांमुळे त्या नागरिकांना पुरवता येत नसल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे मनपाचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुण्यात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

“३५० कोटी पोत्यात भरुन अजित पवारांच्या समोर टेकवा आणि…”

पुणे महानगरपालिकेने रेमडेसिविर इंजेक्शन घ्यायचं ठरवलं होतं त्यासंदर्भात पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेला वितरकांकडून किंवा कंपन्यांकडून इंजेक्शन मिळत नसल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात झालेल्या चर्चेचा संदर्भ देत चंद्रकांत पाटलांनी, “ज्या दिवशी मी अजित पवारांबद्दल बोललो त्या दिवशी हाच मुद्दा होता. मी त्यांना म्हटलं की, ३५० कोटी पोत्यात भरुन अजित पवारांच्या समोर टेकवा आणि म्हणा की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, तुम्ही इंजेक्शन आणि ऑक्सिजन द्या,” असा प्रस्ताव ठेवण्याचं पत्रकारांना सांगितलं.

पालिकेने निविदा काढली पण…

यासंदर्भात बिडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक कोटींच्या कंत्राटासाठी निविदा महापालिकेने काढली होती मात्र त्याला कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. “१ कोटींची इंजेक्शनसंदर्भातील टेंडर कोट करण्यात आलं होतं. पण त्याला कोणाचाही प्रतिसाद आला नाही. कंपन्या आणि वितरकांकडे इंजेक्शन उपलब्धच नसल्याने असं झालं. कोणीही खात्रीशीर पद्धतीने सांगू शकत नव्हतं की आम्ही उपलब्ध करुन देऊ. सगळा कंट्रोल आता एफडीएकडे आहे. आम्ही अगाऊ पैसे देऊन इंजेक्शन घ्यायला तयार आहोत. महापौर निधीमधील अगाऊ पैसे द्यायलाही तयार आहोत. आम्ही कुठल्या पद्धतीने मागे नाहीत. फक्त उपलब्ध करुन द्यायची जबाबदारी राज्य सरकारची आहे,” असं बिडकर म्हणाले.

पाटील म्हणतात , “मी १०० कोटींचे अगाऊ पेमेंट करेन…”

बिडकरांनी दिलेल्या माहितीनंतर चंद्रकांत पाटील यांनी, “माझ्याकडून एक घोषणा करु इच्छितो की, जो वितरक आधी पैसे मागतोय त्याला मी अगदी भीक मागून देईन. महापालिकेने त्या वितरकाला पैसे दिले की त्यांनी माझे पैसे मला परत करावेत. मी १०० कोटींचे अगाऊ पेमेंट वितरकाला देईल. वितरांनी आधीच्या अनुभवावरुन असा नियम केलाय की आधी पैसे घ्यायचे. आधी पैसे घेतले नाही तर मिळत नाहीत, असा त्यांना अनुभव आहे,” असं म्हटलं.

इतकच नाही तर, “राज्यात कुठेही इंजेक्शनसाठी वितरकांना पैसे अगाऊ हवे असतील तर माझ्याकडून घ्यावेत त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळाले पैसे की माझे पैसे परत करावेत,” असंही पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 2:30 pm

Web Title: bjp leader chandrakant patil talk about pune municipal corporation remdesivir purchase svk 88 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Remdesivir : “महाराष्ट्राला २ लाख ६९ हजार इंजेक्शन मिळाली तर ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरड होतोय त्यांना…”
2 Coronavirus : “…तर ६० दिवसात संपूर्ण पुण्याचं लसीकरण पूर्ण करु”
3 ‘सीरम’च्या पुनावाला यांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावं; महाराष्ट्र भाजपाची मागणी
Just Now!
X