“मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता. कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्यासाठी मी ती जागा मोकळी केली. मोकळी केली म्हणण्यापेक्षा तो पक्षाचा आदेश असतो आणि ते माझं कर्तव्य होतं. त्यावेळी मला विधानपरिषदेवर घेतलं जाईल असं सांगण्यात आलं होतं,” असं वक्तव्य भाजपाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी केलं. आपली सक्रियता, पक्षावरील निष्ठा आणि पक्षाला होणारा उपयोग याचा पक्ष नक्कीच विचार करेल याची खात्री असल्याचंही त्या म्हणाल्या. बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

“कोथरूडमधून निवडणूक लढवण्याइतकी दुसरी कोणतीही आनंदाची बाब असणार नाही कारण ते माझं माहेर आहे. सर्व जीवाभावाची मंडळी याठिकाणी आहेत. कोथरूड हे माझ्यासाठी स्वर्ग आहे आणि कोणत्याही महिलेला माहेर किती प्रिय असतं हे सर्वांनाच माहित आहे,” असं मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या. “पुढच्या निवडणुकीत संधी मिळाली तर नक्कीच कोथरूडमधून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. मी कोणत्या अन्य पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे किंवा मला तिकिट देण्यासाठी कोणी प्रयत्नशील आहे, अशा बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. वस्तूस्थिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी एक व्हिडीओ केला होता आणि जे कोणी हा खोडसाळपणा करत आहे त्यांनी तो थांबवावा,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आपण कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही आणि कोणाकडेही तिकिट मागितलं नाही. भाजपाचे पजवीधरचे जे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत त्यांचंही आपण काम करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी जेव्हा विधानसभेची उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आले त्यावेळीही आपण कोणच्या संपर्कात नव्हतो. ज्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही आपण आदरपूर्वक नकार कळवला असल्याचं त्या म्हणाल्या. “गेले अनेक वर्ष मी भाजपाचं झोकून देऊन काम केलं आहे. जी व्यक्ती सक्रिय असते त्याला कामाविना ठेवणं याविषयीच्या त्या भावना आहेत. मला समाजासाठी काही करायचं आहे. ते करण्यासाठी काही जबाबदारी असावी. अगदी मला चीनच्या सीमेवर पाठवलं तरी चालेल,” असंही त्या म्हणाल्या.

पक्षावर नाराज नाही

“माझं पक्षावर नाराज असण्याचं काही कारणच नाही. भाजपानं आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मी माझं संपूर्ण आयुष्यही या पक्षावर ओवाळून टाकेन. कोणाच्या कार्यशैलीविषयी माझी नाराजी असेल किंवा काही म्हणणं असेल तर ते पक्षीय पातळीवर नक्कीच मांडेन. ते माझ्या नाही तर पक्षाच्या हितासाठी मांडेन. मी कायमस्वरूपी पक्षातह आहे. लहानपणापासून संघाचे विचारशैली असलेल्या कुटुंबात वाढले आहे. माझी विचारशैलीही संघाची आहे. तिन्ही वेळेस कारसेवेला गेलेल्या स्वयंसेवकाची मी पत्नी आहे. हा पक्ष माझ्या गुणांची, कृतिशीलतेची दखल घेईल,” असंही वाटत असल्याचं कुलकर्णी म्हणाल्या.