गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात पवार कुटुंबीयांची अधिक चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पार्थ पवार नाराज असून भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. परंतु भाजपा नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पार्थ पवारांना आम्ही भाजपात घेणारही नाही, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी केलं. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांना पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

“पार्थ पवार हे काही भाजपात येतही नाहीत आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. जो काही आहे त्यांच्या घरातील त्यांचा कौटुबिक प्रश्न आहे. त्यामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. त्यांनी तो त्यांच्या घरातच सोडवावा,” असं बापट म्हणाले. जय श्रीराम असं एकटे पार्थ पवारच म्हणत नाहीत तर संपूर्ण जग म्हणत असल्याचंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये यावरून संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अनेकांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीसंदर्भात बोलताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. “पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलं होतं. तेव्हापासून पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे.