वाकड प्रभागातील रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्यावरून वाद

पिंपरी पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व शिवसेनेचे शहरप्रमुख व गटनेते राहुल कलाटे यांच्यात शुक्रवारी पुन्हा एकदा खटका उडला. पालिका मुख्यालयातच त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वाकड येथील बीआरटी रस्त्याच्या स्थळबदलाचा विषय विधी समितीत ऐनवेळी दाखल करून घेण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येते.

शुक्रवारी दुपारी विधी समितीची बैठक होती. वाकड येथील रस्त्याच्या स्थळबदलाचा विषय बैठकीत ऐनवेळी मांडण्यात येणार होता. विधी समितीत शिवसेनेच्या मीनल यादव यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. सदस्यांशी कलाटे यांची प्राथमिक चर्चा झाली, तेव्हा त्यांना होकार मिळाला होता. बैठकीच्या वेळी मात्र तो प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला नाही, त्यावरून कलाटे संतापले. चौकशी केल्यानंतर एकनाथ पवार यांच्या सांगण्यावरून विधी समिती सभापती शारदा सोनवणे यांनी तो प्रस्ताव दाखल करून घेतला नाही, अशी माहिती कलाटे यांना मिळाली. त्यामुळे कलाटे यांनी पवारांकडे विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये बरीच बाचाबाची झाल्याचे सांगण्यात आले.

कलाटे व पवार यांच्यात यापूर्वीही खटके उडाले आहेत. सभागृहात तसेच पालिका आयुक्तांसमोरही त्यांच्यात वाद झाले आहेत. ‘स्मार्ट सिटी’च्या संचालकपदासाठी शिवसेनेने कलाटे यांचे नाव सुचवले होते. मात्र, भाजप नेत्यांनी त्यांचे नाव वगळून शिवसेनेचेच नगरसेवक प्रमोद कुटे यांची वर्णी लावली होती. या मुद्दय़ावरून पवार व कलाटे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा त्यांच्यात खडाजंगी झाली. यासंदर्भात कलाटे म्हणाले,‘ भाजपला वाकड भागात मतदान झाले नाही. त्यामुळे येथील विकासकामे अडवण्याचे घाणेरडे राजकारण भाजपकडून सुरू आहे. पालकमंत्री या भागाचे दौरे करतात. मात्र, येथील लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिली जात नाही. रस्ते मोठे करणार, अशा घोषणा पालकमंत्री देतात. प्रत्यक्षात काहीच होत नाही.’ पवार म्हणाले,‘ विधीची बैठक संपल्यावर तो प्रस्ताव दाखल करण्यासाठी ते आले होते. घाई करण्याचे कारण नव्हते. कारण, येत्या सभेत तो प्रस्ताव येणारच नव्हता. पुढील महिन्याच्या सभेतच तो विषय जाणार आहे.’