भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांनी विजय मिळवला. त्यामुळे ही जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. कोद्रे यांना आठ हजार ९९८, तर शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना पाच हजार ४७० मते मिळाली. कोद्रे तीन हजार ५२८ मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे भाजपवर राजकीय टीका होत आहे.

प्रभाग क्रमांक २२ च्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर मोळक यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे यांना आठ हजार ९९८, शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना पाच हजार ४७० आणि भाजपच्या सुकन्या गायकवाड यांना चार हजार ३३४ मते मिळाली.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार गायकवाड यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे भाजपवर टीका सुरू झाली आहे. या निवडणुकीतील विजयासाठी भाजपच्या सर्व नेत्यांनी सभा, पदयात्रा असे कार्यक्रम केले होते. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी निवडणुकीच्या दरम्यान दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी प्रचाराचे नियोजन केले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीच्या कोद्रे यांनी आघाडी घेतली होती.

चेतन तुपे म्हणाले,की प्रभाग क्रमांक २२ मध्ये आम्ही चारही नगरसेवकांनी गेल्या एक वर्षांत नियोजनबद्ध विकासकामे केली. पूजा कोद्रे यांचा विजय ही आम्ही केलेल्या विकासकामांची पावती आहे. हा विजय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. पूजा कोद्रे या चंचलाताईंचा वारसा पुढे चालू ठेवतील. लोकहिताचे उपक्रम राबविले जातील. भाजप आणि सेनेचे मंत्री, खासदार, आजी माजी आमदारांनी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. महापालिका व राज्यातील सरकारवर जनता नाराज असल्याने भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.