“बिहार आणि इतर ठिकाणच्या पोट निवडणुकीच्या निकालचा परिणाम, राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर स्वाभाविकपणे होणार आहे. या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली असून त्याच जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवाराचा प्रचार करतील” असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

न्यायालयाने जैन मंदिरे उघडण्यासाठी जो आदेश दिला आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, “जैन मंदिर, मशिदी यांच्यासह सर्व मंदिरे खुली करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जशी पोटाची भूक असते. तशी मनाची आणि बुद्धीची भूक भागविण्यासाठी ज्यांची श्रद्धा आहे. ते मंदिरात जाऊ शकतात, पण ज्यांची श्रद्धा नाही. ज्यांना थोतांड वाटते. त्यांना मंदिरात जाणे बंधनकारक नाही. ज्यांना भक्ति करायची आहे. त्यांना का थांबवले जाते” असा सवाल त्यांनी केला.

“आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. परंतु हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता हे उघड करता येणार नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवित आहोत” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “जळगाव जिल्ह्यात एका दलित मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी जळगाव येथे येणार का?” असा सवाल त्यांनी केला.

“सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही. बिहार निवडणुकीचा परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत देखील दिसून येईल” असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या बदल प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देण्याचं टाळलं.