राज्यभरात अतिशय उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अनंत चुतर्थी असून राज्यात ठिकठिकाणी गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेशभक्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते, येथील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गणेशोत्सवात पुण्यात येत असतात. दरम्यान, आज (रविवार) पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या घटनेवरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही.” असं अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

तर, पोलिसांनी गणेशमंडळाचे साहित्य जप्त केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद देखील झाला होता. यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यावर मंडळास पोलिसांनी साहित्य परत केले.

नेमकं काय झालं –

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केलं जात आहे. सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली होती. यावेळी तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीचं वादन थांबवलं; ढोल-ताशे जप्त

दरम्यान तुळशीबाग गणपती मंडळाने पोलिसांनी कारवाई केली नसून फक्त समज दिली असल्याचं म्हटलं आहे. “आमच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पोलिसांनी समज दिलेली आहे,” अशी माहिती मंडळाचे खजिनदार नितीन पंडित यांनी दिली आहे. पोलिसांनी काही वेळाने जप्त केलेलं साहित्य परत केलं. यानंतर शांततेत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla atul bhatkhalkar criticizes chief minister uddhav thackeray msr 87
First published on: 19-09-2021 at 14:16 IST