प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर

महापालिकेच्या प्रभाग रचनेत नव्याने अस्तित्वात आलेल्या कर्वेनगर प्रभागात (प्रभाग क्रमांक ३१) मराठा समाजाच्या नात्यागोत्याचे राजकरण प्रभावी ठरत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. नवीन प्रभाग रचनेत भाजपच्या माजी नगरसेवकांच्या जुन्या प्रभागातील काही भाग येत असल्यामुळे भाजपला येथे यशाची अपेक्षा आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापूर्वीच्या निवडणुकांचा कल किंवा निकाल पाहता भाजपाला स्थानिक ग्रामस्थांकडून येणाऱ्या उमेदवाराचीही आवश्यकता भासणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक राजेश बराटे, सुरेखा मकवाना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे आणि लक्ष्मी दुधाणे, सचिन दोडके आणि मनसेच्या नगरसेविका भाग्यश्री दांगट यांच्या प्रभागाच्या काही भागातून प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर हा तयार झाला आहे. कर्वेनगर गावठाण, शाहू कॉलनी, दुधाणेनगर, इंगळेनगर, ब्रह्मचैतन्य, तपोधाम, पीएमटी कॉलनी असा काही महत्त्वाचा भाग या प्रभागात आहे. मोठय़ा वसाहती, सोसायटय़ा, कर्वेनगर गावठाणाबरोबरच झोपडपट्टय़ांचाही काही भाग या प्रभागात समावष्टि झाला आहे. स्थानिक आणि मुळशीकरांची संख्या या भागात अधिक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर शहराच्या अन्य भागांप्रमाणेच या परिसरात भाजपला मोठे मतदान झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा या प्रभागाचा कल काहीसा वेगळाच आहे. नवीन प्रभाग रचनेत भाजपच्या काही माजी नगरसेवकांचा काही भाग येत असल्यामुळे भाजपला या प्रभागातून यशाची मोठी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी त्यांना काही प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांतून येणाऱ्या उमेदवारावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये या परिसरातून भाजपला मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. मात्र त्यानंतरच्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवू शकेल, असा स्थानिक कार्यकर्ता भाजपला तयार करता आला नाही. हीच बाब लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी मनसेचे नगरसेवक राजेश बराटे यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. बराटे हे तांत्रिकदृष्टय़ा अद्यापही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असले तरी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत ते भाजपचेच उमेदवार राहतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अन्य पक्षातून येणाऱ्या उमेदवारांवरही भाजपची काही प्रमाणात भिस्त राहणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, शिवराम मेंगडे हे देखील या प्रभागातून इच्छुक आहेत. या प्रभागातील दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी असून एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव झाली आहे. या प्रभागासाठी भाजपकडील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षाला तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. मात्र कर्वेनगर परिसरात भाजपचे काहीसा प्रभाव असला, तरी निविर्वाद वर्चस्वासाठी भाजपची मदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयात उमेदवारांवरच राहणार आहे.