खासदार नाना पटोले यांचा सवाल

भगव्या आतंकवादाचा मुद्दा काढून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मदत कशी करतात, असा खळबळजनक सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला. सरसंघचालकांवर हात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फडणवीस-गडकरी मदत का करतात, याचे उत्तर मला हवे आहे, असेही पटोले म्हणाले.

वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात पटोले बोलत होते.

पटोले म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटात सुधाकर चतुर्वेदी हा संघाचा कार्यकर्ता सहभागी होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन या बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. याच चतुर्वेदीने शरद पवार यांचेही नाव घेतले. ‘हिंदू आतंकवाद’ हा पवारांनी निर्माण केलेला शब्द असल्याचा आरोप त्याने केला होता. त्याच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी चोवीस तासांच्या आत भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. मुख्यमंत्री याच राष्ट्रवादीला दिलदार शत्रू आणि सरकारला वाचवणारे ‘अदृश्य हात’ म्हणतात. खरे तर सरसंघचालकाचे पद असे आहे, की पं. नेहरूसुद्धा त्याचा सन्मान ठेवायचे. मला घडवण्यात संघाचा वाटा आहे, असे श्रीकांत जिचकार जाहीरपणे सांगायचे. असे असताना सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे कौतुक कसे केले जाते?      मुंबईतील २६/११ चा दहशतवादी हल्ला हा देशासाठी काळा दिवस आहे. या दिवशी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना हुतात्मा व्हावे लागले. अशोक कामटे यांच्या पत्नीने १२ प्रश्न विचारले होते. ‘त्याची उत्तरे का देत नाही,’ या प्रश्नावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना आम्ही विधिमंडळात भंडावून सोडले होते. सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना आत टाकू असे वाटले होते. छगन भुजबळ यांनाच फक्त आत टाकले. बाकीच्यांना का नाही. याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी करून ‘भुजबळ एकटेच आहेत का,’ असा प्रश्न पटोले यांनी विचारला. लोकप्रतिनिधी असल्याने मी जनतेच्या समस्या, अडचणींना वाचा फोडतो. आपल्या देशातील परिस्थिती बिकट आहे. जो आवाज उठवतो, त्याला मारले जात आहे. बेरोजगारी, नियोजनशून्य कारभार यातून समस्या वाढत आहेत. अवैध संपत्तीचा आरोप असलेले छगन भुजबळ हे एकमेव आहेत का? केवळ महात्मा फुलेंचे वंशज म्हणून त्यांना वेगळा न्याय लावला जात असेल, तर त्यावर आवाज उठवलाच पाहिजे, असेही पटोले म्हणाले.