पुण्याचे भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. अशोक चव्हाण आणि संजय काकडे या दोघांची भेट काही दिवसांपूर्वी झाली होती. या भेटीचा फोटो आजच समोर आला आहे. संजय काकडे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. भाजपाने तिकिट दिले नाही तर तर काँग्रेसकडून ते मिळवायचे यासाठी काकडे यांच्याकडून चाचपणी सुरु करायची असे काकडे यांनी ठरवल्याचेच या भेटीतून दिसून येते आहे.

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसही संजय काकडेंना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चव्हाण आणि काकडे यांची भेट झाली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही या ठिकाणी होते. एका विवाह सोहळ्या निमित्त झालेल्या या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मागील महिन्यात त्यांनी भाजपावर टीकाही केली होती. आता या सगळ्या गोष्टी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा समोर येतात? काकडे काँग्रेसमध्ये जातात, राष्ट्रवादीत जातात की भाजपाकडून निवडणूक लढवतात? या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास तरी आपल्याबाबत चर्चा घडवून आणण्यात संजय काकडे यशस्वी झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.