महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत २१ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २४ ऑक्टोबरला निकाल लागणार हे जाहीर केलं. सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडुशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळो, संपूर्ण देशात सुख-समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करत नड्डा यांच्या हस्ते विधीवत पूजाही करण्यात आली. यानंतर नड्डा यांच्या हस्ते आरती आणि महाअभिषेकही करण्यात आला. या प्रसंगी पुण्याचे खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ व अन्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.