भाजपची ‘राष्ट्रवादी’ झाल्याची टीका होत असतानाच ‘ऑफर’ देणे सुरूच

पिंपरी महापालिकेतील सत्तेसाठी काही पण, असे धोरण ठेवून कामाला लागलेल्या भाजपची ‘राष्ट्रवादी’ झाली, अशी ओरड सगळीकडून सुरू असतानाच शहर राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्यांना भाजपमध्ये आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत यासंदर्भात ‘वाटाघाटी’ सुरू आहेत. त्या यशस्वी ठरल्यास हे दोन्ही नेते भाजपमध्ये येणार आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कारभारी असलेल्या पिंपरी महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना भाजपने गळाला लावले असून, त्यांच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर, माजी महापौर आझम पानसरे यांनी ‘पवारप्रेम’ बाजूला ठेवून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. जगताप, लांडगे, पानसरे यांच्या एकत्रित ताकदीमुळे राष्ट्रवादीपुढे पर्यायाने अजित पवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

त्यामुळे अजित ‘दादा’ धास्तावले आहेत. आपल्या पक्षातील नगरसेवक अथवा संभाव्य उमेदवार दुसरीकडे जाऊ नयेत, याची खबरदारी ते घेत आहेत. अनेकांना त्यांनी स्वत: दूरध्वनी करून ‘इकडे-तिकडे’ जाऊ नका, अशी आर्जव केली आहे.

अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादीच्या आणखी दोन ‘तगडय़ा’ नेत्यांसाठी भाजपने गळ टाकला आहे. या संदर्भात अनेक बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चिंचवड स्टेशन येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील दिग्गज मंडळी एकत्र जमली होती. बापटही तेथे आले. या वेळी राष्ट्रवादीच्या या नेत्यांना बोलावण्यात आले होते. भाजपमध्ये आल्यास काय, असा वाटाघाटीचा विषय होता. उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या प्रवेशाच्या निर्णयावर खूश नसलेला एक आमदार बैठकीतून अध्र्यातून निघून गेला. काही दिवसांत भाजपमध्ये राष्ट्रवादीकडून आलेल्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यावरून भाजपची ‘राष्ट्रवादी’ झाली, अशी टीका होत आहे. मात्र, पिंपरीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी ‘काही पण’, असे ठरवून शहर भाजपने राष्ट्रवादीचे आणखी दोन दिग्गज गळाला लावले आहेत. त्यांच्या वाटाघाटी फळाला आल्यास राष्ट्रवादीला पुन्हा िखडार पडेल, असे दिसते.