महानगर पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र, पाटील यांच पिंपरी-चिंचवड शहरासाठी योगदान काय आहे असा प्रश्न उपस्थित करत आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले नसल्याने निदर्शने करत या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध केला. सोडत असलेल्या नाट्यगृहाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, महानगर पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते, या सर्व राजकीय रंगामुळे आजची सोडत अखेर सत्ताधारी भाजपला रद्द करण्याची नामुष्की ओढावली. राष्ट्रवादी पक्षाने श्रेय लाटण्यासाठी खटाटोप केला असल्याचा आरोप भाजपाने केलाय. या सर्वांमध्ये मात्र सर्वसामान्य नागरिक भरडला गेला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगर पालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून त्याची सोडत आज चिंचवड येथील नाट्यगृह रामकृष्ण मोरे येथे होणार होती. जवळ जवळ 48 हजार नागरिकांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरले असून त्याची सोडत असल्याने नाट्यगृह येथे हजारो नागरिक उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला असून दोन्ही पक्षांनी नौटंकी असल्याचं सर्वसामान्य नागरिकांनी म्हटलं आहे. गेल्या, चार ते पाच तासांपासून नागरिक नाट्यगृहात ठाण मांडून होते.
सर्वसामान्य नागरिक घराचं स्वप्न उराशी बाळगून आजच्या दिवसाची वाट पाहत होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामुळे त्यांची निराशा झाली असून एकमेकांना दोषी ठरवत आहेत. याप्रकरणी भाजपाचे सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले की, राष्ट्रवादीने श्रेय लाटण्यासाठी आजची सोडतीला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दाबाखाली हे सर्व झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेच्या फसवणूक थांबवली असून रावेत येथील आवास योजनेची जागा न्याय प्रविष्ट असल्याची सांगत पालकमंत्री मंत्री अजित पवार यांना निमंत्रण नसल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांना रीतसर आमंत्रण भाजपाने द्यावे अस त्यांनी म्हटलंय. सर्व नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने लवकरच सोडत काढण्यात येईल अशी माहिती महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सोडतीकडे डोळे लावून बसला असून अश्या प्रकारे नागरिकांचा हिरमोड होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 11, 2021 8:33 pm