पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४२ (अ) पुरूषांमधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि (ब) महिलांमधुन भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एका जागेवर उमेदवार विजयी झाल्याने काही खुशी कही गम म्हणावे असे चित्र आहे.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले. यानंतर आज झालेल्या मत मोजणीत प्रभाग ४२ (अ) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना २० हजार २२४ एवढी मतं मिळाली. यानुसार सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर (ब) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना २३ हजार ९१९ तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना २४ हजार ८५१ या मतं मिळाली. या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या निवडणुकीत प्रत्येकी एका जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी विजयी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुक नक्कीच चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.