भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खासदार संजय काकडे यांनी केलेल्या विधानाचे शहर भाजपमध्ये उमटल्याचे पहाण्यास मिळाले. संजय काकडेंना भाजपाची कार्यपद्धती ठाऊक नसावी म्हणून त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यांची अशी वक्तव्ये पक्ष हिताला बाधा आणणारी आहेत. राजकीय विधान करताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. अशा शब्दात भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रक काढून निषेध नोंदवला.
या पत्रकात असे म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीची निश्‍चित ध्येयधोरणे आणि संघटनात्मक कार्यप्रणाली आहे. संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही याबाबत संघटना पातळीवर निर्णय घेतले जातात. काकडे यांना ही कार्यपद्धती माहित नसावी, म्हणून ते बेजबाबदारपणे विधाने करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार आणि पुणे महापालिकेतील सर्व भाजपच्या नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. असे गोगावले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. आता शहर भाजपकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रका ला संजय काकडे काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.