शिवसेनेच्या वाटणीला असलेला भोसरी विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षातील गटबाजीतून भोसरीसह परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या अंकुश लांडगे यांच्या नावाने शहर भाजपाची ओळख आहे, त्या लांडगे यांचे नाव वापरायचे नाही, अशी तंबी या कुटुंबीयांनी दिल्याने पवार यांची चांगलीच पंचाईत झाली.
भोसरीतील अंकुश लांडगे नाटय़गृहात आयोजित भाजपच्या बूथ मेळाव्यासाठी लावलेल्या फलकांवर दिवंगत अंकुश लांडगे तसेच त्यांच्या पत्नी आशा लांडगे यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यास आशा लांडगे व कुटुंबीयांनी यांनी तीव्र आक्षेप घेतला. फडणवीस येण्यापूर्वी ते काढून टाकण्यास सांगण्यात आले. त्यावरून तणाव होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. ज्या फलकांवर लांडगे यांचे फोटो होते, त्यावर पक्षाचे झेंडे लावून वेळ निभावून नेण्यात आली. कार्यक्रमासाठी फडणवीस सात वाजता आले. माजी खासदार सुभाष देशमुख, आमदार बाळा भेगडे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, अमर साबळे, प्रमोद निसळ यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. या निमित्ताने पवार यांनी सर्व युक्तया वापरून कार्यक्रमाला गर्दी जमवली होती. तथापि, ज्या भोसरीत कार्यक्रम होता, तेथील भाजप कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला होता. भोसरी मतदारसंघाचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून पवारांनी स्थानिकांना डावलण्याचे धोरण ठेवले आहे. लांडगे परिवाराला ते विचारात घेत नाहीत. आशा लांडगे यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला होता, त्यांचे पत्रिकेत नाव नव्हते. फक्त राजकीय कार्यक्रमांमध्ये फोटोंचा वापर केला जातो, त्यामुळेच आशा लांडगे यांनी ते फोटो काढण्यास लावले, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.