करोना विषाणूमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झालेला असताना नागरिकांच्या हातामध्ये पैसा नाही. त्यातच राज्यात अनेक भागात महावितरणकडून नागरिकांना जादा वीज बिलं दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातही असा प्रकार निदर्शनास आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात रास्ता पेठेतील महावितरणच्या प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्यावतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंदील घेऊन आणि लाईट बिलं जाळून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

पाटील म्हणाले, “मागील चार महिने राज्यातील जनता करोना विषाणूच्या संकटाला सामोरे जात आहे. या काळात रोजगार नसल्याने त्यांच्या हातात पैसा नाही. त्यात महावितरणकडून अनेक नागरिकांना जादा बिलं देण्यात आली आहेत. आता ही बिलं ते कशी भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही जादा बिलं सरकारने मागे घ्यावीत.” जनतेचे लाईट बिल माफ करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.