पुण्यातील मनसेचे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे यांच्या हत्येची सुपारी दिल्या प्रकरणी मांजरी गावातील भाजपाचे सरपंच शिवराज घुलेंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोरे यांच्यावर गोळीबार करुन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल ढोरे हे चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी थांबले असताना त्यांच्यापासून काही अंतरावर एक गोळी पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ती रिव्हॉल्वरमधील गोळी असल्याचे लक्षात आले. यानंतर विशाल ढोरे यांना दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने ‘तुमच्या खुनाची सुपारी घेतली आहे’, असे सांगितले. शेवटी विशाल यांनी हडपसर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांच्या दोन पथकांनी सापळा रचून तीन आरोपीना अटक केली आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केला असता विशाल ढोरे यांच्या हत्येसाठी १० लाखांची सुपारी घेतली होती आणि या बाबत मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले आणि प्रमोद कोद्रे यांच्याशी फोन वर बोलणे झाले होते, अशी माहिती त्या तिघांनी पोलिसांना दिली.

सुपारी देणारे भाजपाचे मांजरी गावाचे सरपंच शिवराज घुले यांच्यासह सहा जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींकडून एक गावठी कट्टा,२ मॅगझिन, ४ काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.