News Flash

भाजपला हवा पिंपरीसह आणखी एक मतदारसंघ

भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून भाजप-शिवसेनेतील वातावरण तापलेले असतानाच शहरातील तीनपैकी दोन मतदारसंघ मिळावेत, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

| June 24, 2014 03:30 am

भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून भाजप-शिवसेनेतील वातावरण तापलेले असतानाच शहरातील तीनपैकी दोन मतदारसंघ मिळावेत, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या अनौपचारिक बैठकीत तसे सुतोवाच करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचा हा पवित्रा शिवसेनेला रुचणार नसल्याने आगामी काळात यावरून चांगलाच कलगीतुरा रंगण्याचे संकेत आहेत.
दिवंगत ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या शोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस रविवारी पुण्यात आले होते. सभेनंतर खासदार अनिल शिरोळे यांच्या ‘परिचय’ कार्यालयात फडणवीस यांची पिंपरीतील पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा झाली. राज्यभरातील अन्य विषयांचा ऊहापोह झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली. शिवसेनेकडे दोन तर भाजपकडे एकच मतदारसंघ असून पिंपरी मतदारसंघाची मागणी कधी शिवसेनेकडून तर कधी रपिंाईकडून होत आहे, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत पिंपरी मतदारसंघ भाजप सोडणार नाही, असे त्यांनी निक्षून  सांगितले. याशिवाय, आगामी निवडणुकीत राज्यभरातील जागा वाढवून घेतल्या जाणार आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये एक जागा वाढवून घेऊ, त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांमध्ये आनंदाची लहर उमटली.  
राज्यातील राजकारणात ‘मोठा भाऊ’ असलेल्या शिवसेनेकडे शहरातील तीनपैकी चिंचवड आणि भोसरी हे दोन मतदारसंघ आहेत. तर, ‘धाकटय़ा’कडे पिंपरी हा एकमेव मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीनही ठिकाणी युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना कडवी झुंज दिली होती. भोसरी मतदारसंघ हवा म्हणून भाजपच्या एका गटाचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. तथापि, शिवसेनेचा त्यास कडवा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत भोसरी देणार नसल्याचे सेना नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. अलीकडे, महायुतीत आलेल्या रपिंाईने पिंपरी मतदारसंघाची वारंवार मागणी केली आहे. आगामी काळात खासदार रामदास आठवले तो विषय प्रतिष्ठेचा करतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. अशाप्रकारे जागावाटपावरून आधीच तिढा असताना भाजपच्या प्रस्तावित भूमिकेने जागावाटप आणखी जटील होण्याची चिन्हे आहेत. देशभरात भाजपची ताकद वाढलेली असताना पिंपरी-चिंचवड शहरातील ‘बळ’ वाढवण्याचे पक्षश्रेष्ठींचे नियोजन आहे. त्यासाठी आता विधानसभेची एक जागा वाढवून घेण्यात येत असून त्यापुढील काळात महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2014 3:30 am

Web Title: bjp shiv sena political pimpri bhosari devendra phadanvis
Next Stories
1 दप्तराचे ओझे शासनाने कमी केले, तरी शाळांनी मात्र वाढवले
2 महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ होणार
3 महिलेची छेड काढणाऱ्या मद्यधुंद पोलिसाला बेदम चोप
Just Now!
X