जगभरात पुणे शहर आणि पुण्यातल्या लोकांचा स्वभाव, त्यांचा तिरकसपणा, दुपारी १ ते ४ झोपण्याची सवय यावरुन बरेचसचे विनोद आपण ऐकले आहेत. परंतू आता चक्क पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना दुपारी १ ते ४ झोपण्याच्या सवयीवरुन टोला लगावला आहे . पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी पुण्यात काही जणांना दुपारी १ ते ४ झोपण्याची सवय असते. या काळात काही काम सांगू नका असं सांगितलं जातं. मोदींकडे बघा ते २२ तास काम करतात असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांना उपदेशाचे डोस पाजले आहेत.

“विविधं काम करण्यासाठी निवडून यायचं असतं, नाहीतर पाच आणि सहा वेळेस आमदार होऊन काही उपयोग नाही. टार्गेट आपल्या आयुष्यात ठरवायची असतात. जे लोकांनी दिलं ते काम करण्यासाठी दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकलं पाहिजे. मोदी कधी टीकेची काळजी करत नाहीत. किती ही टीका करा, ते सरळ चालत असतात. अयोध्येमध्ये काही जणांनी टीका केली…कोरोना आहे ई-भूमिपूजन करा. परंतु मोदी अयोध्येत गेले भूमिपूजन करून परत आले. रात्री झोपताना आपण आज चुकीची गोष्ट केली नाही याचं समाधान असलं पाहीजे.” कार्यक्रमात उपस्थित भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना पाटील यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी पुढे बोलत असताना पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी २४ तासात २२ तास काम करतात. त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे. एक योगी स्थिती असते की जिकडे तुम्ही न झोपता सुद्धा राहू शकता. त्या दिशेने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. दोन तास तरी का झोपायचं. काही जणांना दुपार ची झोपण्याची सवय असते. पुणे परिसरात जास्त आहे. दुपारी एक ते चार काही सांगू नका. मोदींकडे बघा ते २२ तास काम करतात असं म्हणत पाटलांनी पुणेकरांनाच टोला लगावला.